अमरावती जिल्ह्यातून एक असा धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यामुळे “हॅनी ट्रॅप” किती धोकादायक असू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.
एका ६४ वर्षीय शेतकऱ्याला प्रेम, मैत्री आणि बदनामीच्या भीतीच्या जाळ्यात अडकवत तब्बल ७० लाख रुपये उकळल्याचा आरोप एका पती-पत्नीवर करण्यात आलाय.
सुरुवात झाली एका साध्या ओळखीपासून…
शेतकरी वारंवार एका मोबाईल रिचार्ज दुकानात जात होता. तिथे दुकानदाराच्या पत्नीने त्याच्याशी मैत्री वाढवली. बोलणं वाढलं… विश्वास वाढला… आणि याच विश्वासाचा पुढे सापळा तयार करण्यात आला.
आधी दुकानदाराने शेतकऱ्याकडून १० हजार रुपये उसने घेतले… आणि वेळेवर परतही केले. त्यामुळे शेतकऱ्याचा पूर्ण विश्वास बसला. पण काही दिवसांनी खेळ सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा.
आरोपी पतीने शेतकऱ्याला धमकी दिली की, दुकानात लावलेल्या स्पाय कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालंय. कॉल रेकॉर्डिंग, चॅट्स आणि फोटो आमच्याकडे आहेत… आणि हे सगळं समाजात व्हायरल करू… इतकंच नाही तर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचीही धमकी देण्यात आली.
सामाजिक बदनामीच्या भीतीने हा शेतकरी पूर्णपणे दबावाखाली गेला… आणि मग सुरू झाली पैशांची वसुली.
नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२४… तब्बल चार वर्ष हा ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होता.
कधी १ लाख… कधी २ लाख… तर एकदा थेट १० लाखांचा चेक… शिवाय रोख रक्कमही घेतली गेली. अशा प्रकारे आरोपी दाम्पत्याने तब्बल ७० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सततच्या धमक्या, मानसिक ताण आणि आर्थिक फसवणुकीमुळे शेतकरी इतका खचला की त्याला आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. अखेर एका जवळच्या व्यक्तीने धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
आता नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तांत्रिक पुरावे तपासत असून आरोपी फरार आहेत.
ही घटना फक्त एका शेतकऱ्याची नाही… तर डिजिटल युगात विश्वास, भीती आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कशा प्रकारे लोकांना जाळ्यात ओढलं जातं, याचं भीषण उदाहरण आहे.
