पुणे शहरालगतच्या मांजरी परिसरात अनधिकृत बांधकामांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप होत आहे.
ग्रामपंचायत काळापासून सुरू झालेली ही बेकायदा बांधकामे आता पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतरही थांबलेली नाहीत. उलट महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे बांधकामे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
मांजरी गावठाण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत.
मोठ्या सोसायट्यांमध्ये घर घेणे परवडत नसल्याने मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक कमी किमतीत या इमारतींमध्ये सदनिका घेत आहेत. मात्र भविष्यात या इमारतींवर कारवाई झाल्यास हजारो कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे वाघोली आणि लोहगाव परिसरात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते, मग मांजरीतच एवढे अभय का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्त्यावर पथारी टाकणाऱ्यांवर कारवाई करणारे प्रशासन मोठमोठ्या बेकायदा इमारतींकडे मात्र डोळेझाक का करत आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.
या अवैध बांधकामांमध्ये अनेक राजकीय नेते, पदाधिकारी आणि स्थानिक व्यावसायिकांचा सहभाग असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
ग्रामपंचायत काळात जुन्या परवान्यांच्या आधारे अनेक बांधकामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप यापूर्वीही झाला होता.
आजही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून बांधकामे सुरू असल्याचे चित्र आहे.
सामान्य नागरिक कर्ज काढून, आयुष्याची पुंजी लावून घर घेतात… पण उद्या ही इमारत अनधिकृत ठरली तर जबाबदार कोण?
महापालिका अधिकारी या बांधकामांवर कारवाई का करत नाहीत? दोषींवर गुन्हे का दाखल होत नाहीत? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तुमच्या परिसरातही अशी अवैध बांधकामे सुरू असतील… अधिकारी दुर्लक्ष करत असतील… तर रोखठोक महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधा.
तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. अशा अवैध बांधकाम विकसकांकडून ग्राहकांची कशी फसवणूक होते पुढच्या भागात आपण पाहूया अनाधिकृत बांधकामाबाबत मालिका सुरु करत आहोत.
मांजरीत अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट? PMC अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष की राजकीय वरदहस्त!
