महाराष्ट्रात डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’ची ओळख देशभर आहे… आणि याच लातूर पॅटर्नमधलं एक मोठं नाव म्हणजे RCC क्लासेस. पण आता हेच नाव NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभर चर्चेत आलंय.
RCC म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना CBI ने अटक केलीय… आणि त्यानंतर एकच प्रश्न विचारला जातोय… नेमके हे मोटेगावकर कोण आहेत?
शिवराज मोटेगावकर… विद्यार्थ्यांमध्ये ‘एम सर’ म्हणून प्रसिद्ध. रेणापूर तालुक्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. त्या पैशातून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं.
1999 मध्ये… भाड्याच्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत… फक्त 10 विद्यार्थ्यांसोबत RCC ची सुरुवात झाली. सुरुवातीला मोटेगावकर सायकलवरून प्रवास करत… स्वतः हाताने नोट्स लिहून विद्यार्थ्यांना शिकवत असत.
पण पुढे RCC चा विस्तार एवढा वाढला की आज लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला अशा अनेक शहरांत RCC च्या शाखा सुरू झाल्या.
राज्यातील NEET, JEE आणि CET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी RCC मोठं ब्रँड बनलं. दरवर्षी हजारो विद्यार्थी… आक्रमक जाहिरातबाजी… ऑनलाइन शिक्षण मॉडेल… आणि आता RCC ची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटींच्या घरात गेल्याचं बोललं जातंय.
पण आता या यशस्वी प्रवासावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
CBI च्या तपासानुसार, NEET परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधी मोटेगावकरांकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती. त्यांच्या मोबाईलमध्येच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सापडल्याची माहिती समोर येतेय.
इतकंच नाही… काही विद्यार्थ्यांना आणि विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवल्याचाही संशय आहे. मात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास मोटेगावकर टाळाटाळ करत असल्याचं CBI सूत्रांचं म्हणणं आहे.
एकेकाळी मेहनतीनं उभं केलेलं साम्राज्य… आता पेपरफुटीच्या आरोपांमुळे हादरलंय.
आता प्रश्न फक्त एका क्लासचा नाही… तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे… आणि त्यामुळेच संपूर्ण देशाचं लक्ष आता CBI च्या पुढच्या कारवाईकडे लागलंय.
