रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला फसवल्याची कबुली काल दिली होती. तसेच ती चूक दुरुस्त करणे शक्य असल्याच नमूद करत महाराष्ट्रात सत्ताबदलाचे संकेत दिले होते. त्याचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेत भाजपवर निशाणा साधला. भाजपला मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा नेता सापडणार नाही. ही शोधाशोध करण्याच्या नादात त्यांचेच आमदार फुटतील अशी फटकेबाजी अजित पवार यांनी विधानसभेत केली.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा समाचार घेताना अजित पवार यांनी चुकीला माफी नाही, असे सांगितले. तसेच त्यांच्या मताला उद्धव ठाकरे यांची संमती असल्याचे सभागृहाला दाखवून दिले. त्यानंतर भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, तुम्ही मध्य प्रदेशप्रमाणे बघत असाल तर ते या ठिकाणी शक्य नाही. तुमच्या मागच्यांना सांभाळण्याकडे लक्ष द्या. नाहीतर मागचे पटपट गायब होतील असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
काय म्हणाले होते मुनगंटीवार ?
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली. यानंतर दोन्ही पक्षाने एकमेकांवर फसवणुकीचा आरोप केला. मात्र, भाजपने शिवसेनेला फसवल्याची कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा उचलला. कधी न कधी आम्ही ही चूक सुधारू असे धक्कादायक विधान सुधीर मुनगुंटीवार यांनी केले.