मुंबई

नातू “पार्थ पवारच्या” राजकीय मार्गासाठीच “शरद पवारांची” माढ्यातून माघार

मुंबई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून माघारीची चर्चा सुरु असतानाच पार्थ पवार यांच्या मावळ मधील उमेदवारीमुळे त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र पवार कुटुंबातून लोकसभा मीच लढणार, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते.

त्यातच माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नाव पुढे आले आणि त्यांनी आपली उमेदवारी जाहीरही करून टाकत पदाधिका-यांच्या बैठक घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे पार्थ यांना मावळमधून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत होती. मावळमधील पक्षातील गटतट लक्षात घेता पार्थ पवारच हा मतदारसंघ जिंकू शकतात, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धारणा आहे. पार्थ यांना उमेदवारी दिल्यास शेकाप त्यांना पाठिंबा देणार आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या होर्डिंग्जवर पार्थ यांची छबी दिसू लागली आहे.

बारामती, मावळ आणि माढा अशा तीन तीन लोकसभा मतदारसंघांत एकाच कुटुंबातील उमेदवार दिल्यास त्यातून चुकीचा संदेश जाईल, अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटूंबियांची बैठक झाली. आणि नव्या पिढीकडे सुत्रे देण्यावर एकमत झाले, अशी माहिती शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मोदी लाट ऐन भरात असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी २०१४ साली माढ्याची जागा खेचून आणली होती. शिवाय प्रभाकर देशमुख यांच्यासारखा आणखी एक पर्याय पवारांकडे आहे. त्यामुळेच पवारांनी माघार घेतल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

0 0 votes
Article Rating
25 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments