पुण्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहून शहरात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. बापट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच हा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
“मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा; पण तीन टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून राहून लॉकडाउनसारखा सोपा आणि मोठा निर्णय घेऊ नका”, अशा शब्दात पुण्याचे खासदार भाजपा नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत विरोध दर्शवला.
एकीकडे अनलॉकचे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे पुण्यासारख्या शहरात लॉकडाउन लागू करायचा हे कसलं धोरण?, असा सवालही यावेळी बापट यांनी उपस्थित केला. पुणे शहर व्यापारी संघानेही या लॉकडाउनला विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाउन झाला तर उद्रेक होईल, असे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी म्हटलं आहे.
करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ठाम विरोधानंतरही केवळ पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी येथील प्रशासनाला जाहीर करणे भाग पडले.
नवा निर्णय..
पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरांमध्ये १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा-भाईंदर येथे आणखी नऊ दिवस टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.