राजकारण

सचिन पायलट आणि18 समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याच्या हालचाली

जयपूर -राजस्थानात बंडाचे निशाण फडकावणारे तरूण नेते सचिन पायलट आणि कॉंग्रेसमधील त्यांच्या 18 समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी पायलट यांच्यासह 19 आमदारांना नोटिसा बजावून शुक्रवारपर्यंत उत्तर मागवले आहे.

पायलट यांनी थेट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारल्याने राजस्थानातील सत्तारूढ कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला. त्यानंतर कॉंग्रेसने पायलट यांचे पंख छाटत त्यांची उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदांवरून हकालपट्टी केली. त्यानंतरही बंडखोरीबद्दल पायलट आणि त्यांच्या समर्थकांना माफ करण्याच्या मुडमध्ये कॉंग्रेस नसल्याचे संकेत मिळत आहेत.

राजस्थानमधील पेच मिटवण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सोमवारी आणि मंगळवारी बैठका झाल्या. बैठकांना उपस्थित राहण्याचा आदेश कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना देण्यात आला होता. मात्र, पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पक्षादेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पायलट आणि त्यांच्या समर्थकांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जावे, अशी विनंती कॉंग्रेसकडून सभापतींना करण्यात आली. त्यानंतर सभापतींनी नोटिसा बजावल्या.

पायलट घोडेबाजारात सामील-गेहलोत
खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांच्याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतल्याचे सूचित होत आहे. राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजपबरोबर पायलट घोडेबाजारात सामील होते, असा थेट आरोप गेहलोत यांनी केला. घोडेबाजार झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

मोठ्या रकमेच्या ऑफर दिल्या गेल्या, असा दावा त्यांनी केला. मात्र, पायलट यांचा थेट नामोल्लेख त्यांनी टाळला. त्याऐवजी त्यांनी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख करून पायलट यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला.

0 0 votes
Article Rating
235 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments