मुंबई – भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार, एकनाथ खडसे, संभाजी निलंगेकर यांना भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे समजते. यासाठी लवकरच पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करुन या सर्व नेत्यांना थेट राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकतीच भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचीही घोषणा झाली. यात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांची लवकरच राष्ट्रीय स्तरावर वर्णी लागेल असा अंदाज लावला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मात्र, अद्याप भाजपकडून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेविषयी सूचक इशारा केला होता.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषयांवर सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीत राजकीय आणि संघटनात्मक बदलावर चर्चा झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे फडणवीस यांनी चर्चेनंतर स्पष्ट केले आहे.