मुंबई

खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण;अपहरणाचा मास्टरमाईंड समीर वानखेडेचा मित्र मोहित कंभोज – नवाब मलिक

माझ्या या लढाईत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा साक्षीदारांनी पुढे यावे आणि माझ्या लढाईला पाठबळ द्यावे…

समीर वानखेडे याने मुंबई शहराला पाताळ लोक बनवलंय…

मुंबई दि. ७ नोव्हेंबर – आर्यन खानचे अपहरण करण्यात आले आहे. मोहित कंभोज याच्या मेहुण्याकडून ट्रॅप लावून आर्यनला यामध्ये अडकवण्याचा डाव झाला त्यानंतर २५ कोटीची मागणी करण्यात आली. ही डील १८ कोटीमध्ये झाली. त्यातील ५० लाख उचलण्यात आले. मात्र एका सेल्फीमुळे हा खेळ बिघडला. या अपहरणाचा मास्टर माईंड मोहित कंभोज असून कंभोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत असा आणखी एक सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान मोहित कंभोज आणि समीर वानखेडे यांच्यातील मीटिंगचे व्हिडिओ आम्ही समोर आणणार होती. पण त्यांचे नशीब चांगले की सीसीटिव्ही फुटेज बंद असल्याने ते मिळाले नाहीत असेही नवाब मलिक म्हणाले.

 

मागील एक महिन्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी मी आपल्याला काही माहिती दिली होती. २ ऑक्टोबरला कार्डीलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई करून त्यात आर्यन खानसोबत ८ लोकांना अटक करण्यात आले. हा सर्व प्रकार फर्जीवाडा असल्याचे आम्ही स्पष्ट केले होते. त्यावर मलिक असे प्रश्न का उपस्थित करतात अशी टीका करण्यात आली. यामध्ये माझ्या जावयाला अटक करण्यात आल्यामुळे बोलले जात आहे असा आरोपही करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये ३ लोकांना सोडण्यात आले. या तीन लोकांमध्येच मोठा खेळ झाला आहे.

समीर दाऊद वानखेडे यांचा एकच धंदा आहे तो म्हणजे श्रीमंत लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करायचे. यामध्ये प्रभाकर साहिल यांनी माझ्या सांगण्यावरून आरोप केले आहेत असे सांगण्यात येते. मात्र मी सांगितल्याप्रमाणे हॉटेल ‘द ललित’ मे छुपे है कूछ राज’ यावर पगारे यांनी मला भेटून त्यातील अनेक गोष्टी उघड केल्या. यामध्ये समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून कशाप्रकारे हॉटेल ललितमध्ये गैरव्यवहार सुरू होता हे समोर आले. त्यांचा एकच धंदा आहे कशा प्रकारे पैसा उकळता येईल. ड्रग्ज माफियांना संरक्षण कसे दिले जाईल. याबद्दल काल प्रायव्हेट आर्मीची प्रेस झाली. यामध्ये सांगण्यात येते की, नवाब मलिक यांनी प्लॅन करून हे घडवलं आहे. या सर्व प्रकरणात सुनील पाटील हा व्यक्ती प्रायव्हेट आर्मीचा पार्ट असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

समीर वानखेडे याने शहराला ‘पाताळ लोक’ बनवले असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.

ही लढाई कोणत्याही शासकीय यंत्रणेशी नाही… कोणत्याही पक्षाशी नाही… ही लढाई केवळ चुकीच्या लोकांविरुद्ध आहे… या शहरात ड्रग्जच्या नावाखाली होणारी लुटमार आणि यामध्ये अनेकांना अडकवण्याचे काम होतं आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

एनसीबीचे डिजी सांगतात की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मिट – ३ कारवाई झाली मात्र असे झालेले नाही. तुम्हाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. १३ लोकांना अडकवण्याचा डाव झाला. रक्कम मागितली गेली, आर्यन खानला अडकवण्यात आले. आमचीही भूमिका आहे की, देशात पूर्णपणे नशामुक्त व्हायला हवी यात जे लोक नशा करतात त्यांना नशामुक्ती केंद्रात दाखल करायला हवे, जे लहान धंदे चालवतात त्यांना पकडायला हवे मोठ्या माशांवर आणि सप्लाय करणाऱ्यावर कारवाई व्हायला हवी. मात्र यात चुकीचा गैरव्यवहार करणाऱ्या समीर वानखेडे, मोहित कंभोज, मनीष भानुशाली यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

साक्षीदार हा आरोपी होऊ शकत नाही त्यामुळे माझ्या या लढाईत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी साक्षीदार म्हणून पुढे यावे आणि माझ्या लढाईला पाठबळ द्यावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले.

आजही मोहित कंभोज, सॅम डिसुझा यांचे कारनामे याशिवाय काही बोगस पत्रकारांना कसे हाताशी धरून ड्रग्ज सेवन करणार्‍या लोकांना कसे अडकवले जाते व खंडणी वसूल केली जाते कसे स्टींग केले जाते याचा व्हिडीओही यावेळी नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर दाखवला.

यावेळी नवाब मलिक यांनी सुरुवातीपासून कसा घटनाक्रम घडत गेला त्याची इंत्यभुत माहितीही माध्यमांना दिली.