पुणे

विकासनिधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या प्रधान सचिवांना मंत्र्यांच्या सूचना : माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची माहिती ः नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी

पुणे ः हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, शेवाळेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, उरुळी देवाची येथे रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य अशा सुविधांसाठी मोठ्या निधींची गरज असल्याची मागणी माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी निवेदनाद्वारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्याला मंत्री शिंदे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत प्रधान सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले.
भानगिरे म्हणाले की, जुना महंमदवाडी-कौसरबाग (प्रभाग क्र.२६) आणि नवीन महंमदवाडी-उरुळी देवाची (प्रभाग क्र.४६)मधील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १६ कोटी ५० लाख रुपये निधीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सर्वे क्र.५५ मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, स्व. गोपीनाथ मुंडे उद्यान, सर्वे क्र.७३ मधील महात्मा ज्योतीराव फुले जलतरण तलाव, डॉ. दादा गुजर शाळेजवळील पाझर तलाव, रस्ते यासह उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.
दरम्यान, महंमदवाडी येथील न्याती गार्डनच्या शेजारील अमेनिटी स्पेसवर पालिकेने हॉस्पिटलचे आरक्षण टाकले होते, ते रद्द करून तेथे उद्यान व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ससाणेनगर रेल्वे गेट बंद असल्याने हांडेवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे गेट क्र.७ व भुयारी मार्गासाठीच्या जागेतील मालक, शेतकरी, निवास, दुकानमालकांना योग्य मोबदला मिळावा यासाठीही मंत्रीमहोदयांनी सराकात्मकता दर्शविली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.