पुणे

ऑनलाईन रेशनिंग नोंदणीसाठी काल थेऊर येथील मंडलाधिकारी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

थेऊर गावातील सर्व लोकांनी मिळून ऑनलाईन नोंदणीसाठी थेऊर येथील मंडल् अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, “रेशनिंग आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच” अशा घोषणा देत लोकांनी निषेध व्यक्त केला, थेऊर येथील जवळपास 70 ते 80 टक्के समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळणे अपेक्षित आहे, विशेषतः स्वस्त धान्य दुकान मार्फत पुरवण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

परंतु खूपच कमी प्रमाणात नागरिकांचा या योजनेत समावेश असून बहुतेक करून नागरिकांचा या अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश झालेला नाही, कारण शासनाने ही सर्व सुविधा ऑनलाईन केल्यामुळे यांना याचा लाभ मिळत नाही यासाठी जिल्हा पुरवठा तसेच तालुका पुरवठा विभागाने या नागरिकांचे ऑनलाईन नोंदणी करून त्यांना या योजनेत समाविष्ट करावे यासाठी थेऊर ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन मागणी केली होती यावर पुरवठा अधिकाऱ्याने कसलीही हालचाल न केल्याने आज थेऊर येथील मोठ्या संख्येने नागरिक मंडलाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला व आपल्या हक्काच्या या योजनेसाठी मागणी केली.

आमच्या या मागणीचा आठ दिवसांत विचार झाला नाहीतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले, खरे तर शासनाच्या योजनांची नागरिकांना माहिती देणे त्यांचा लाभ उपलब्ध करून देणे हे शासकीय अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य असताना देखील अनेक योजना या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे असे लाभार्थी वंचित राहतात आज महसूल विभागाशी संबंधित असलेल्या अन्नसुरक्षा योजनेच्या संदर्भात नागरिकांनी जो मोर्चा मंडल अधिकारी कार्यालयावर काढला याचे निवेदन स्वीकारण्यासाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित असणे आवश्यक होते परंतु मंडळ अधिकारी अथवा पुरवठा अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित नव्हते.

त्यामुळे गाव कामगार तलाठी सविता काळे यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी महाराष्ट्र साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, माजी उपसरपंच शहाजी जाधव, गावच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे, सुरेश चव्हाण, यशवंत कुंजीर, सुखराज कुंजीर, शरद काकडे, धनाजी जाधव, लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.