महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांची मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेट

Rokhthok Maharashtra 1 0

पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांचे विचार व वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य होत आहे. – मंत्री आदिती तटकरे

पुणे, : पद्मश्री महर्षी डॉ.सिंधुताई सपकाळ (माई) यांचे विचार व वारशाचे संगोपन करुन पुढच्या पिढीपर्यंत पोहचवित असताना माईंची कुठेही कमतरता भासणार नाही, याकरीता सर्व मिळून काम करीत आहेत, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केले. या कामासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, विभागीय उप आयुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे, सप्तसिंधु महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, मनशांती छात्रालयाचे अध्यक्ष विनय सपकाळ आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आदितीताई तटकरे म्हणाल्या, माईंनी समाजातील विविध ठिकाणी भेट देत सामाजिक कार्य केले. या संस्थेला माईंचा मोठा वारसा, सहवास लाभलेला आहे. त्यांचे विचार आत्मसात करून नव्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे करीत असताना त्यांच्या विचारांमधून माईचे दर्शन पुढच्या पिढीला घडले पाहिजे यासाठी सर्वजण पूर्ण प्रयत्न करीत आहेत.

संस्था मधील मुला-मुलींनी सादर केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक करीत त्या म्हणाल्या, येथील विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी, पुढे जाण्याची तळमळ आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास दिसून येत आहे. तसेच येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यावरूनच त्यांच्यावर झालेले माईचे संस्कार दिसून येत आहेत. सन्मती बालनिकेतन संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली.

कार्यक्रमापूर्वी आदितीताई तटकरे यांनी संस्थेची पाहणी केली. तसेच कार्यक्रमा नंतर येथील विद्यार्थ्यां सोबत बसून येथील शिक्षण, पायाभूत सुविधा, आहार आदीं बाबत संवाद साधला.

माईंच्या कन्या व संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, माईंनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. त्यांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी असून त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरु आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.