दौंडमध्ये विमा फसवणुकीचा आरोप; डॉक्टरांवर गुन्हा दाखल
विमाधारकाशी संगनमत करून असत्य व संशयास्पद वैद्यकीय अहवाल आणि ओळखपत्रे तयार करून विमा कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बजाज विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक अभिजित शशिकांत मोरे, वय ४३, यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून डॉ. विशाल गोविंद मिसाळ, माधुरी विशाल मिसाळ आणि विमाधारक संकेत राजू होले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. विशाल मिसाळ आणि माधुरी मिसाळ यांनी संकेत होले यांच्याशी संगनमत करून असत्य वैद्यकीय अहवाल, संशयास्पद दस्तऐवज आणि ओळखपत्रांवरील शिक्क्यांचा वापर केल्याचा आरोप आहे.
विमा कंपनीची आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचून हे दस्तऐवज विमा कंपनीकडे सादर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना १३ जुलै २०२४ ते १९ जुलै २०२६ दरम्यान दौंडमधील जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सध्या एका विमा क्लेमबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलीस हवालदार अमीर शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





