मैत्रिणीने ओळख करून दिली अन्…कॅफेत 17 वर्षीय मुलीवर अत्याचार!
मैत्रिणीने ओळख करून दिली अन् समीरनं घेतला फायदा, नागपुरात 17 वर्षीय मुलीवर कॅफेत अत्याचार, नागपूरमधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणी २० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित १७ वर्षीय मुलीशी तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने २९ जुलै रोजी तिला नंदनवन परिसरातील एका कॅफेमध्ये नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने जवळपास महिनाभर हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
दरम्यान, आरोपीने पीडितेवर प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणी करण्यासाठी दबाव आणल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





