“पुणेकर काय आहेत कळेल!” महापौरांचा इशारा

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुणे बंदच्या आवाहनावरून आता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आंदोलक आणि रोहित पवार यांना थेट खुलं आव्हान दिलं आहे.
MPSC विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील सर्व MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात यावं आणि पुणे बंद पाडावं, असं आवाहन केल्याचं सांगितलं जात आहे.
यावर प्रतिक्रिया देताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, “पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे. लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. पुणे शहराने विद्यार्थ्यांना कायम मायेची उब दिली आहे.”
तसंच, “रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी पुणे बंद पाडून दाखवावं. कॉलेजचे विद्यार्थी पोहोचू शकत नाहीत, रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत, त्यावेळी पुणेकर काय आहेत हे कळेल,”असं आक्रमक विधान महापौरांनी केलं.
विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं आणि राजकीय पक्षांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेले सर्वजण खरोखर विद्यार्थी आहेत का, अशी शंकाही मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात राहतात, त्यांना पुणे बंद करणं योग्य वाटतं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना मागण्या मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा पुणेकरांना त्रास होऊ नये, अशी भूमिका महापौरांनी मांडली आहे.
आता रोहित पवार आणि MPSC आंदोलकांकडून या आव्हानाला काय उत्तर दिलं जात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.