भाचीची छेड काढण्यास विरोध केला; मामाचा खून, आरोपीला जन्मठेप!
परभणीत भाचीची छेड काढण्यास विरोध केल्याच्या रागातून मामाचा खून करणाऱ्या आरोपीला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमित प्रकाश घटमळ, वय २३, रा. कुर्बानअली शहा नगर, दर्गा रोड, परभणी, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२७ एप्रिल २०२४ रोजी मारोती दिगंबर लांडगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घराशेजारी राहणाऱ्या अमित घटमळ आणि सुमित घटमळ यांना त्यांच्या भाचीला विनाकारण बोलण्यास मनाई करण्यात आली होती.
याचाच राग मनात धरून आरोपींनी मारोती लांडगे यांचे भाऊ नागनाथ लांडगे यांच्यावर चाकूने पोट, मांडी आणि दंडावर वार केले. तसेच फरशीने डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप होता.
नागनाथ लांडगे यांच्यावर परभणीत उपचार सुरू होते. मात्र, ३ मे २०२४ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम ३०२ वाढवण्यात आले.
पोलिस निरीक्षक एस. एम. ननवरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश-२ व्ही. एस. माने यांच्या न्यायालयात हा खटला चालला.सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी एकूण १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लता लांडगे, अश्विनी लांडगे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.अखेर न्यायालयाने अमित घटमळ याला दोषी ठरवत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.या कारवाईत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, वंदना आदोडे, रिजवाना शेख आणि सचिन धबडगे यांनी काम पाहिले





