चाकणमध्ये अनधिकृत बांधकामांवर ‘हातोडा’!
खेड तालुक्यातील चाकण नगर परिषदेने शहराच्या इतिहासातील अनधिकृत बांधकामांवरील सर्वांत मोठी धडक कारवाई केली आहे. बुधवारी ९ सप्टेंबर रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तात तीन अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये ही कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
नगर परिषदेने यापूर्वी अनधिकृत होर्डिंग, अभिन्यास आणि राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांविरोधात तीन टप्प्यांत कारवाई केली होती. त्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली.
संबंधित बांधकामधारकांना नियमानुसार नोटिसा देऊन सुनावणीची संधी देण्यात आली होती. मात्र, बांधकामे न हटवल्याने प्रशासनाने निष्कासनाची कारवाई केली. काही संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयीन आदेश आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या कारवाईसाठी २० नगर परिषद अधिकारी, ५० कर्मचारी, १० पोलिस अधिकारी आणि ८० पोलिस कर्मचारी तैनात होते. तसेच ३ जेसीबी, ६ पोकलेन, ६ ट्रॅक्टर/कटर आणि ६ व्हिडिओग्राफर यांची मदत घेण्यात आली.
यापुढेही अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी नगर परिषदेची बांधकाम परवानगी घेऊनच बांधकाम करावे, तसेच तोतया विक्रेते, एजंट आणि दलालांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





