56 वर्षीय शिक्षकाकडून विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य!
सरकारी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाने तिसरी आणि चौथीतील विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं.
वाशिम तालुक्यातील सरकारी शाळेत हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती आहे. एका पीडित विद्यार्थिनीने पालकांना याबाबत सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं.
दिलीप नावाच्या या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींना मांडीवर बसवून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या एका चिमुकलीने शिक्षिकेकडे आपली व्यथा सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.
घटना उघडकीस येताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. वाशिम पोलिसांनी शिक्षकाला अटक करून त्याच्याविरोधात POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित आणि इतर विद्यार्थिनींचे इन-कॅमेरा जबाब नोंदवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भिवंडीत पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादात फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मोहम्मद याकूब रुस्तुम अली सिद्दीकी, वय 47, हे जुना ठाणा रोडवर हातगाडीवर फळे विकत होते. पैसे उधार घेतल्याच्या कारणावरून त्यांचा लक्ष्मीबाई नाईक या महिलेसोबत वाद झाला. या वादातून मारहाण झाल्यानंतर मोहम्मद यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी लक्ष्मीबाई नाईक यांना अटक केली असून, तपास सुरू आहे.





