गांधी हत्या प्रकरणातील कपूर आयोगाच्या अहवालावर राहुल गांधी यांच्या बचाव पक्षाकडून उलटतपासात महत्त्वाचे प्रश्न; सावरकरांच्या मुंबईतील निवासस्थानावर पोलिसांची नजर असल्याचे सात्यकी सावरकर यांची कबुली

Rokhthok Maharashtra 19 0

 

पुणे- पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीच्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण उलटतपासणी झाली.
राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलटतपास घेताना महात्मा गांधी हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायमूर्ती जीवनलाल कपूर आयोगाने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष, ऐतिहासिक नोंदी आणि त्यातील पुराव्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
२० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या प्रार्थनासभेच्या वेळी झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर सावरकर यांच्या मुंबईतील निवासस्थानावर पोलिसांनी नजर ठेवली होती का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी पोलिसांची नजर असल्याचे मान्य केले.
तसेच कपूर आयोगाच्या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात नमूद करण्यात आलेले पुरावे हिंदू महासभेलाही त्याच स्वरूपात लागू आहे असे नमूद आहे असा प्रश्न ॲड. पवार यांनी विचारला. त्यावर जे पुरावे आरएसएस या शीर्षकाखाली आहेत ते जसेच्या तसे लागू होतात, असे सात्यकी सावरकर यांनी उत्तर दिले. पण इथेही, पुण्याचे तत्कालीन जिल्हादंडाधिकारी श्री. दहेजा यांनी हिंदू महासभेविषयी असे पुरावे निदर्शनास आले नसल्याचे म्हटल्याचा संदर्भही त्यांनी दिला.
तुमचे आजोबा गोपाळ गोडसे हे त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांचे स्वरूप, ध्येय व उद्दिष्टे एकच आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, माझे आजोबा गोपाळराव गोपाळ गोडसे यांचे ते वैयक्तिक मत होते; मात्र याबाबत मला स्वतःला काही सांगता येणार नाही, असे उत्तर फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी दिले.
आजच्या उलटतपासणीत कपूर आयोगाच्या अहवालातील ऐतिहासिक नोंदी आणि गांधी हत्या प्रकरणाच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर प्रश्नोत्तरे झाली. या उलटतपासणीमुळे संबंधित ऐतिहासिक दस्तऐवज आणि त्यातील निष्कर्षांचा न्यायालयीन संदर्भात विचार करण्याची संधी निर्माण झाली आहे. अ‍ॅड संग्राम कोल्हटकर हे फिर्यादीकडून काम पहात आहेत.
या खटल्यात अ‍ॅड.पवार यांना अ‍ॅड. सुयोग गायकवाड, अ‍ॅड. कैलास जिरे,
अ‍ॅड. हर्षवर्धन पवार,अ‍ॅड रेणूका बाटे व अ‍ॅड ज्ञानेश्वरी जाधव हे सहकार्य करीत आहेत.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील उलटतपासणी ४ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.