वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत
सोलापुरात शेतात पिकांना पाणी देताना सर्पदंश झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडिलांच्या डोळ्यांसमोरच मुलावर काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रुपेश नागनाथ चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे. रुपेशची वागदरी येथे शेती होती. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे वडील नागनाथ यांच्यासोबत शेतात काम करण्यासाठी गेला होता.
पिकांना पाणी देण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर रुपेश झाडाखाली विश्रांतीसाठी झोपला. त्याचवेळी सापाने त्याला चावा घेतला. सर्पदंशानंतर रुपेश बेशुद्ध झाला.
वडील नागनाथ यांनी तातडीने त्याला नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ. श्रीकृष्ण बागल यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, मुलाला ज्या सापाने चावा घेतला, तो साप वडील नागनाथ यांनी चक्क शासकीय रुग्णालयात सोबत आणला होता.
रुपेश दिवसा शेतीचं काम करत होता, तर रात्री भजन करत असे. त्याच्या निधनाची बातमी समजताच मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली. आई-वडिलांनी हंबरडा फोडला. रुपेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.





