दत्तक मुलानेच घर विकल्याचा आरोप; वृद्धाश्रमात राहण्याची वेळ
“अशी औलाद कशाला?” असा सवाल विचारण्याची वेळ आग्र्यातील एका वृद्ध दांपत्यावर आली आहे. दत्तक घेतलेल्या मुलाने आणि सुनेने छळ करून आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं तब्बल ७५ लाखांचं घर अवघ्या ४६ लाख रुपयांत विकल्याचा आरोप या वृद्ध दांपत्याने केला आहे.
आग्र्यातील या दांपत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संबंधित मुलाला दत्तक घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं, त्याचं शिक्षण केलं. मात्र, पुढे मुलगा आणि सुनेने मानसिक छळ केल्याचा त्यांचा आरोप आहे.
इतकंच नाही, तर घरावर ताबा मिळवत ते घर विकून टाकल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःचं घर गमावल्यानंतर आता या वृद्ध दांपत्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे.
न्यायासाठी या दांपत्याने २०२२ पासून एक हजारांहून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं सांगितलं आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित मुलगा, सून किंवा स्थानिक प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.





