पाच महिन्यांच्या चिमुकलीची कात्रीने हत्या; आई पोलिसांसमोर फक्त रडत राहिली
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील तिरमलवाडी गावातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या आईने आपल्या पाच महिन्यांच्या मुलीची कात्रीने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.
अनिता क्षीरसागर, वय २५, असं आरोपी महिलेचं नाव असून तिच्या पाच महिन्यांच्या मुलीचं नाव श्रीशा आहे.
गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अनितावर मानसिक आजारासाठी उपचार सुरू होते. मंगळवारी तिचे पती महादेव क्षीरसागर आणि कुटुंबीय कोल्हापूरला नातेवाइकांकडे गेले होते. अनितावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिच्या जाऊबाईंवर होती.
दुपारी अनिता घर सोडून निघाली होती. जाऊबाईंनी तिला घरी आणलं आणि, “पोरीला एकटं सोडून कुठं निघालीस? ती उपाशी आहे, तिला चार घास भरव,” असं सांगून त्या शेतात गेल्या.
काही वेळाने अनिताने पती महादेव यांना फोन करून, “मी पोरीला मारलंय,” असं सांगितलं. महादेव घरी पोहोचले असता श्रीशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
या घटनेनंतर अनिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान ती काहीही बोलली नाही, तर मुलीचं नाव काढताच फक्त रडत होती. या घटनेचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.





