पुण्यातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातून अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष एम. एस. हिरेमठ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
डॉ. शिरीष हिरेमठ हे ७५ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सोपान बाग येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हृदयरोग निदान आणि उपचार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. जोशी हॉस्पिटलमधून १९८२ मध्ये त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डिअॅक कॅथलॅबचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
विशेष म्हणजे, आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या.
कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष असलेल्या डॉ. हिरेमठ यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. शिरीष हिरेमठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.