१५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश! मोशीतील तरुण अटकेत.

Rokhthok Maharashtra 7 0

सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड! देशभरातील ६५ नागरिकांची तब्बल १५० कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी पुण्यातील मोशी येथील २५ वर्षीय तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन संजय काळे असे असून तो मोशी येथील रहिवासी आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने ‘म्युल अकाउंट’च्या तपासादरम्यान त्याचा सहभाग उघडकीस आणला.
तपासात आरोपीने स्वतःच्या नावावर ९ बँक खाती उघडल्याचे समोर आले. या खात्यांमध्ये ऑनलाइन फसवणुकीतून आलेली रक्कम जमा करून ती एटीएम आणि चेकद्वारे काढण्यात येत होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या तीन खात्यांमध्येच सुमारे १ कोटी १५ लाख रुपये जमा झाल्याचे आढळले आहे. एनसीआरपी पोर्टलवरील माहितीनुसार, देशभरातील ६५ नागरिकांची एकूण १५० कोटी रुपयांची फसवणूक या प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपले बँक खाते किंवा सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांपासून सावध राहावे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.