“हडपसरमध्ये पावसाचा कहर! | रस्ते जलमय, प्रचंड ट्रॅफिक जॅमने नागरिक हैराण”
पुण्यातील हडपसरमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे…
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. जागोजागी पाण्याची तळी साचली आहेत…
रस्ते चिखलमय झाले आहेत… आणि नागरिकांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वैदुवाडी चौक, मगरपट्टा, हडपसर चौक आणि ससाणेनगर भुयारी मार्ग— सर्व ठिकाणी पाण्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसतोय. विशेषतः भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कामांसाठी निधी मंजूर होतो… पण प्रत्यक्षात कामे मात्र होत नाहीत—असा आरोप नागरिक करत आहेत. सध्या ड्रेनेजच्या झाकणांची कामे सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
एकीकडे पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था… तर दुसरीकडे वाहतूक कोंडी… यामुळे हडपसरकर त्रस्त झाले आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्यापेक्षा दंडात्मक कारवाईत अधिक गुंतलेले दिसतात. परिणामी, 5 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास खर्च करावा लागतोय… आणि इंधनाचाही मोठा अपव्यय होत आहे. पुण्याच्या पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. राजकीय एकीचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता… यामुळे हडपसरमधील समस्या वाढत चालल्या आहेत.
आता प्रश्न एकच—
हडपसरच्या रखडलेल्या समस्या कधी सुटणार?



