चिपळूण येथील डि. बी. जे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या विजय गुरव वाणिज्य शाखेत प्रथम

Rokhthok Maharashtra 82 0

संगमेश्वर / प्रतिनीधी :(विलास गुरव) येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचलित डि. बी. जे. महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या गुरव वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात सर्वप्रथम आली आहे. शेतकरी कुटुंबातून असलेल्या दिव्याने मेहनतीच्या जोरावर यश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचलित डि. बी. जे. महाविद्यालयाची यशस्वी परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम राहिली आहे. या महाविद्यालयाचा उत्तम शिक्षण देण्यासोबत गुणवंत विद्यार्थी घडविण्यावर जास्त भर असतो. त्यामुळेच या महाविद्यालयाचे नाव चिपळूण येथे शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्याने घेतले जाते. अशा या प्रतिष्ठित व नावाजलेल्या महाविद्यालयाचा अपेक्षेप्रमाणे निकाल लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेत दिव्या गुरव ही सर्वप्रथम आली आहे.
दिव्याची घरची परिस्थिती जेमतेमच असून ती एका गरीब शेतकरी कुटुंबातून आली आहे. वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असून त्यांना दोन्ही मुलीच आहेत. दिव्याची मोठी बहीण कंपनीत कामाला जाऊन वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न करते. दोन्ही मुली हुशार असल्याने व वडिलांना कामात मदत करत असल्याने त्यांनी मुलाची उणीव भरून काढली आहे. दिव्या पहिल्यापासूनच अभ्यासात तरबेज असल्याने तिला परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री होती परंतु सर्वप्रथम आल्याचे कळताच तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. तिच्या या यशामागे वडिलांचा आशिर्वाद आणि बहिणीची साथ ही देखील तितकीच मोलाची आहे.

आपल्या या यशाबद्दल दिव्याने सर्व शिक्षकवृंद, प्राचार्य यांचे आभार मानले आहे. तिच्या या निकालाबाबत सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्या ही पुणे येथील पत्रकार विलास गुरव यांची पुतणी असून त्यांनीदेखील तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.