डेटिंग ॲपवर ओळख अन् ७ कोटींचा गंडा! पुण्यातील व्यावसायिकाची सायबर फसवणूक

Rokhthok Maharashtra 1 0

पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या महिलेच्या माध्यमातून एका ५३ वर्षीय व्यावसायिकाला तब्बल ७ कोटी ७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
कोंढवा परिसरात राहणाऱ्या या व्यावसायिकाचा भोसरी एमआयडीसीमध्ये स्पेअर पार्ट्सचा कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची डेटिंग ॲपवर एका महिलेशी ओळख झाली. तिने “करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल” असं सांगत त्यांना एका वेबसाईटची लिंक पाठवली.
सुरुवातीला वेबसाईटवर मोठा नफा दिसत असल्याने व्यावसायिकाने टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र पैसे परत काढण्याचा प्रयत्न करताच वेगवेगळी कारणं सांगून आणखी पैसे भरण्यास भाग पाडलं गेलं.
अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यावसायिकाने पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस तपास करत आहेत.
ऑनलाइन गुंतवणूक आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.