पुणे

पुण्याचे जिजाऊनगर नावात नामांतर करा – विकास पासलकर यांची मागणी

पुणे:

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करण्यात आले आहे. या भुमिकेला आमचा नेहमीचा पाठिंबा राहणार आहे. परंतु, ज्या पुणे शहराला राजमाता जिजाऊंनी वसवले त्या पुणे शहराचे नाव जिजाऊनगर अथवा जिजापुर असे करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाल महाल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख, महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डुबल आणि सहआयुक्‍त संदिप कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज फांऊडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, विराज तावरे, स्मिता वडघुले, मंदार बहिरट यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार येसुबाई फेम प्राजक्‍ता गायकवाड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आबेदा इनामदार, महाराणी ताराराणी पुरस्कार सहाय्यक पोलीस आयुक्‍त सुषमा चव्हाण आणि प्राथमिक शिक्षिका रुपाली शिंदे यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर आदर्श माता सन्मान शालिनी जगताप, स्मिता लांजेकर, भारती सोनवणे, पुष्पा दौंडकर, सरस्वती पाटील, निलीमा शिंदे, लता गांगुर्डे, राजश्री भोसले आणि मंदार शेडगे यांचा तर कोरोना काळात विविध पातळीवर सेवाभावी कार्याने ठसा उमटविणार्‍या सायगी नायर, अस्मिता मोरे, तृप्‍ती कोल्हे, वैशाली जाधव, रंजना जाधव, क्रांती साळवे आणि संगिता पाटील या महिलांचा ही गौरव करण्यात आला.

पासलकर पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊंच्या विचाराने आगामी काळात काम होणे गरजेचे आहे. ज्या वास्तूमध्ये स्वराज्य निर्माणकरता शिवाजी महाराजांना घडविले तो लाल महाल कमी जागेत आहे ही मोठी शोकांतिका आहे. याबाबत शासनाने विचार करावा.

विजयसिंग देशमुख म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला महापुरुषांचा मोठा वारसा मिळाला असून त्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे काम आहे. आता मिळालेल्या पुरस्कारार्थींचे समाजाप्रती दायित्व वाढले असून ते सार्थकी लावावे. याप्रसंगी सुषमा चव्हाण यांनीही मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वडघुले, विराज तावरे आणि प्रशांत धुमाळ यांनी तर दत्ता पासलकर यांनी आभार मानले.

परिस्थिती बदलण्याची धमक…

या पुरस्काराने आता जबाबदारी वाढली आहे. माझ्या कामाची ही सुरुवात झाली असून त्यामध्ये खुप यश मिळावायचे आहे. शिवाजी महाराजांच्या तुलनेत संभाजी महाराजांचा इतिहास पुढे आलेला नाही तसेच येसुबाईंचा इतिहास उपलब्धच नव्हता. परंतु या भुमिकेनंतर आता पुस्तके उपलब्ध होऊ लागली असून येसुबाईंचा इतिहास समोर आला आहे. जिद्द, चिकाटी असेल तर परिस्थिती बदलण्याची धमक आपल्यामध्ये असते, असे प्रतिपादन स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील येसुबाई फेम प्राजक्‍ता गायकवाड हिने व्यक्‍त केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x