मुंबई

आरक्षणाच्याबाबतीत सरकारची टोलवाटोलवी, खोटी स्टोरी रचून आमदारांचं निलंबन, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) सुरुवात वादळी ठरली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

12 आमदारांवर खोटे आरोप लावले

निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारला उघडं पाडल्यानं भाजप आमदारांचं निलंबन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आम्हाला ज्याची शंका होती तेच झालं, खोटे आरोप करत भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. भाजपाच्या एकाही आमदाराने शिवी दिली नाही. शिवी कुणी दिली हे सर्वांनी पाहिलं आहे. . शिवसेनेचे सदस्य होते त्यांनी धक्काबुक्की केली. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीनं क्षमा मागितली आणि तो विषय संपवून बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी रचण्यात आली. आरक्षणाच्याबाबतीत या सरकारचं टोलवाटोलवीचं धोरण असून 106 आमदारांना निलंबित केलं तरी संघर्ष सुरुच राहणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

ठाकरे सरकार म्हणजे तालिबानी सरकार

ठाकरे सरकार म्हणजे तालिबानी सरकार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. आजची घटना अतिशय निंदनीय असल्याचंही शेलार यांनी म्हटलं आहे. शिवीगाळ करणारे भाजपचे सदस्य नव्हते, ते शिवसेनेचे होते, असा आरोप शेलार यांनी केला आहे. क्षमा मागूनही निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण ओबीसीसाठी आमचा लढा सुरुच राहणार असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x