मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे ‘नटसम्राट’ पद्मविभूषण, दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड गेले. ते 98 वर्षांचे होते. गेले दोन वर्ष त्यांची प्रकृती तोळामासा होती. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी (दि.6) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांनी सकाळी साडे सात वाजता अखेरच श्वास घेतला अन् त्यांच्या अभिनयावर निस्सिम प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला. हे वृत्त पसरताच देशावर दु:खाची गडद छाया पसरली. त्यांच्या मागे जुन्या काळातील प्रख्यात अभिनेत्री सायरा बानो या त्यांच्या पत्नी आहेत.
श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने कुमार साहेब यांना खार रोड येथील रुग्णालयात रविवारी साडेआठ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या काही चाचण्या केल्या आहेत. त्याच्या अहवालाची वाट पाहात आहोत. त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून तुम्ही ईश्वराकडे प्रार्थना करा, त्यामुळे आम्ही त्यांना लवकर घरी घेऊन जाऊ शकू, असे भावनिक उद्गार सायरा बानो यांनी त्यावेळी काढले होते.
दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून त्यांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी माहिती देण्यात येत होती. दिलीपकुमार यांना करोनाबाह्य पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास झाला. डॉ. नितीन गोखले यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना ऑक्सिजनवर ठेवले असून व्हैंटिलेटर लावलेलेल नसल्याचे त्यात स्पष्ट करण्यात येत होते.
शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली. त्याबाबत ट्विट केले असून त्यात ते म्हणाले होते की, प्रख्यात अभिनेते दिलीपकुमारजी यांची खार हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्यावरील उपचाराविषयी सायरा बानो यांच्याकडून माहिती घेतली. दिलीप कुमार यांना लवकर बरे वाटावे म्हणून मी प्रार्थना करतो.
या 98 वर्षीय अभिनेत्याला गेल्या महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळाने त्यांना घरी सोडण्यात आले होते. हिंदुजामध्ये ते दोन दिवस होते. त्यांचे काही आरोग्य निर्देशांक योग्य नसल्याचे निदान करण्यात आले होते.
भारतीय सिनेमात अभिनयाचे अंग आणण्याचे श्रेय दिलीप कुमार यांच्याकडे जाते. पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ठ नायक या वर्गात सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे नायक म्हणून त्यांचा विक्रम आहे. बॉलीवूड आणि जागतिक चित्रपट सृष्टीतील सर्वात महान कलाकार म्हणून ते ओळखले जातात.
बॉम्बे टॉकिजने निर्माण केलेल्या ज्वारभाटा या चित्रपटाने त्यांनी सिनेसृष्टीत 1944 मध्ये पदार्पण केले. तब्बल पाच दशक आपली अभिनयाची कारकीर्द सजवणाऱ्या या नायकाने तब्बल 65 चित्रपटांत आपला ठसा उमटवला. अंदाज (1949), आन (1952), दाग (1952) आणि देवदास (1955) या चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्याचा कस जोखला. दिलीप कुमार 1976 पासून पाच वर्ष सिनेअभिनयापासून दूर राहिले. त्यानंतर त्यांनी चरित्रात्मक भूमिका करण्यास सुरवात केली. शक्ती (1982), मशाल (1984), कर्मा (1986),सौदागर (1991) मधील चरित्रात्मक भूमिकांनाही त्यांनी नायकाच्या भूमिकेएवढीच लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्यातील अभिनेत्याचे गारूड प्रेक्षकांवर अखेरपर्यंत कायम होते.
पेशावरमध्ये 1922 मध्ये जन्मलेल्या महंमद युसुफ खान यांचे वडील जमीनदार होते. त्यांची त्याकाळी देवळाली (नाशिक) आणि पेशावरमध्ये अडतीचे दुकान होते. त्यांचे शिक्षण देवळालीत झाले. राज कपूर यांच्या सारख्या बालमित्रांत (नंतर ते ही चित्रपटसृष्टीत त्यांचे सहकारी झाले) वाढलेल्या दिलीप कुमार यांच्यावर त्यामुळे निधर्मीवादाचा पगडा बसला. तो अखेरपर्यंत कायम होता.
पुण्यातील वास्तव्य
1940च्या मध्यावर आपल्या वडिलांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी घर सोडले. ते पुण्यात आले. तेथे एका आँग्लोइंडियन जोडपे आणि पारशी कुटुंबीयांच्या मदतीने ते राहू लागले. त्यांच्या इंग्लिशवरील प्रभुत्वामुळे त्यांना लष्कराच्या कॅंटिनमध्ये एक स्टॉल मिळाला. ते कंत्राट संपल्यानंतर ते मुंबईला गेले. त्यावेळी त्यांच्याजवळ पाच हजार रुपये होते.
मुंबईत आल्यानंतर वडिलांच्या मदतीने घरगुती कर्जाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र तेथे त्यांना डॉ. मानसी भेटल्या. त्यांनी त्यांना बॉम्बे टॉकिजमध्ये जाण्यास सुचवले. तेथे त्यांची भेट बॉम्बे टॉकिजच्या मालक देविका राणी यांच्याशी झाली तेथून त्यांचा प्रवास चित्रपटसृष्टीत सुरू झाला.
2015 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. 2000 ते 06 या काळात ते राज्यशभेचे सदस्य होते. 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मनित करण्यात आले. 1998 मध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान ए इप्तियाझ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
रोखठोक महाराष्ट्र न्युज कडून या “नटसम्राट” अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली