पुणे – शहरासाठी सीरम इन्स्टिट्यूटने कोविड प्रतिबंधक लसीचे २५लाख डोस देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आणणे दोन महिने उलटून गेले तरी भाजप नेत्यांना जमेना. तिसऱ्या लाटेचा धोका दिसत असतानाही लसीकरण संथ गतीने चालू आहे अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून पुण्यासाठी कोविशील्ड लसीचे २५लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखविली. मात्र, त्याकरिता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे सीरमने म्हटले होते. भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारची परवानगी मिळविणे आवश्यक होते. परवानगीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची आम्ही भेट घेऊ असे जूनच्या पहिल्या आठवड्यात महापौरांनी जाहीर केले होते. त्यापुढे पत्रकबाजी आणि आश्वासने याखेरीज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काहीच केले नाही. पुण्याला जादा डोस मिळत आहेत हे लक्षात घ्या, तातडीने ते मिळवा, पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन ३१ मे रोजी मी, भाजपच्या नेत्यांना केले होते. पण, त्यांना या विषयात काही गांभीर्य दिसले नाही. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री बदलले तरी महापौरांची भेट काही झालेली नाही. आताही पुणे शहर आणि जिल्ह्यात कोविडची साथ नियंत्रणात आलेली नाही. जादा लसीकरणाची गरज आहे, अशी मतं वैद्यकीय तज्ज्ञांनी गेल्या दोन दिवसांत मांडलेली आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कोविडची साथ चिंताजनक आहे. त्यातही पुण्यात जास्त काळजीची स्थिती आहे. लसीकरण मात्र संथगतीने चालू आहे. सरकारी अहवालानुसार पुण्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ १३टक्के आहे आणि फक्त पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ५५टक्केच आहे. ही आकडेवारी पहाता पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही समोर दिसतो आहे. तत्पूर्वी लसीकरणाचे प्रमाण पूर्णपणे वाढवायला हवे आहे. कोविड साथीचे बदलते स्वरुप पहाता तिसरा डोसही घ्यावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन पुण्यात जादा डोसची किती गरज आहे हे लक्षात येऊ शकेल, याकडे मोहन जोशी यांनी लक्ष वेधले आहे आणि भाजपच्या उदासिनतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कळावे.
आपला,
मोहन जोशी,
माजी आमदार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.