दिल्ली

कर्नाटकमधील एका खेडूत महिलेच्या अफाट कामाची दखल – तुलसी गौडा यांचा पद्म पुरस्काराने सन्मान

मुंबई – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या उपस्थितीत पद्म पुरस्काराचे वितरण होत आहे. त्यामध्ये, आपल्या असामान्य कर्तृत्वाने पद्म पुरस्कारासाठी निवड झालेल्या असामान्य व्यक्तींचा गौरव होत आहे.

त्यातच, एक आहेत तुलसी गौडा. कर्नाटकमधील एका खेडूत महिलेच्या अफाट कामाची दखल घेऊन सरकारने तुलसी गौडा यांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला आहे. पद्म पुरस्कार स्विकारण्यासाठी जाताना तुलसी गौडा यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पर्यावरण संवर्धनात आणि हजारो वृक्षांची लागवड व वाढ करण्यात तुलसी गौडा यांनी मोलाचं काम केलंय. म्हणूनच, जंगलाच्या एन्सायक्लोपिडिया म्हणून तुलसी गौडा यांची ओळख आहे. त्याच तुलसी गौडा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराचा सन्मान स्विकारण्यासाठी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी नमस्कार घातला. त्यावेळी, या दोन्ही नेत्यांनीही त्यांना नमस्कार घातल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अंगावर नऊवारी लुगड्याचा पारंपरिक पोशाष अन् अनवाणी पाय घेऊन ही झाडांची माऊली पुरस्कार स्विकारायला जात होती. त्यावेळेचा त्यांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कर्नाटकमधील मागास प्रवर्गातून येणाऱ्या तुलसी गौडा यांनी आपल्या कर्तृत्वाने पद्मश्री पुरस्काराचा सन्मान मिळवला आहे. सोशल मीडियातून सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी, भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत ‘जंगलाच्या एनसायक्लोपिडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील तुलसी गौडा यांचा देखील समावेश होता. वनसंवर्धन, पर्यावरण, झाडे आणि रोपांचे मोठ्या प्रमाणात ज्ञान असल्यामुळे तुलसी गौडा यांना ‘एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुकामधील होन्नाळी गावात तुलसी गौडा यांचा जन्म झाला. तुलसी गौडा यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या आईसोबत शेतामध्ये मजुरीसाठी जायच्या. तसेच तुलसी गौडा यांचा कमी वयात लग्न झालं. पण त्यांचे पती गोविंद यांचं काही वर्षातच निधन झाले. पण अशा बिकट परिस्थितीतही न डगमगता तुलसी गौडा यांनी पर्यावरणाविषयीचं आपलं प्रेम जरासुद्धा कमी होऊ दिलं नाही.

आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक झाडे लावली

तुलसी गौडा यांनी आतार्पयत एक लाखांपोक्षा जास्त झाडे लावली आहे. वृक्षरोपणाबाबत प्रचंड आवड असल्यामुळे त्यांना वनविभागाने नोकरी करण्याची संधी दिली. त्यानंतर तुलसी गौडा यांनी जवळपास 14 वर्ष वनविभागात काम केले. कामपासून निवृत्ती घेत्यानंतरही त्यांनी झाडे लावण्याचे काम सोडले नाही. आज त्यांचा उदरनिर्वाह निवृत्तीनंतरच्या पेन्शनमधूनच होतोय. मला लहानपासूनच वृक्षाचं संगोपन करायला आवडत असल्याचे तुलसी गौडा यांनी सांगितले. तसेच आपण पर्यावरणाबाबत जागरुक असलो पाहिजे कारण झाडांना जगवणं आपली सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आता वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांचा नातू शेखरकडे दिले असल्याचे देखील तुलसी गौडा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.