पुणे

“कौटुंबिक वादातून दोघांची आत्महत्या, एकाची हत्या – घटनेने शिरूर तालुक्यात खळबळ”

लोणी काळभोर – प्रतिनिधी – अप्पा कदम

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील दोघांची आत्महत्या आणि एकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचले आहे. या घटनेचा अधिक तपास आता शिरूर पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे करत आहेत.
पती समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि बहिण माया सातव अशी तिघांची नावे आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. पती समीर, पत्नी वैशाली आणि बहिण माया यांच्यात रात्री कोणत्या तरी कारणाने वाद झाला. या वादानंतर बहिण माया सातव हिने घराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती भाऊ समीरला मिळताच समीर आणि त्याची पत्नी वैशाली यांच्यामध्ये सकाळी वाद निर्माण झाला. या वादातून समीरने पत्नी वैशालीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करुन मग विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
कौटुंबिक वादानंतर माया सातव या बुधवारपासून बेपत्ता होत्या. कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत सापडला. बहिणीच्या आत्महत्येची बातमी मिळताच धक्का बसलेल्या समीरचा घरी येऊन बायकोशी वाद झाला. याच वादातून समीरने पत्नीवर हल्ला केला, यात ती जागीच ठार झाली. यानंतर समीरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान या तिघांमध्ये नेमका काय वाद झाला हे अद्याप कळू शकले नाही.पोलीस उपनिरीक्षक संदिप कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.