Uncategorized

लोणी काळभोर मुठा कालव्यावरील पुल ठरतोय धोकादायक, त्यामुळे पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे केली मागणी हवेली प्रतिनिधी:-अमन शेख


लोणी काळभोर ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा शिवालय परिसराकडे जाणारा व ५७ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला नवीन मुठा कालव्यावरील पुल अखेरची घटका मोजत आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या पुलावरून दररोज सुमारे पाच हजार नागरिक येथून ये जा करीत  आहेत. त्यामुळे या पूलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य नागेश काळभोर यांनी केली आहे. 

                              या संदर्भात लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन दिले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता पल्लवी जोशी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नागेश काळभोर यांनी हि मागणी केली.  

                             यावेळी बोलताना नागेश काळभोर म्हणाले या गर्दीच्या पुलावरून चारचाकी गाडी व एखादे अवजड वाहन गेल्यास हा पूल हलत आहे. हवेली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र असलेल्या रामदरा शिवालय या ठिकाणी जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते. त्यामुळे दररोज सुमारे एक हजार पेक्षा जास्त भाविक या ठिकाणावरून ये जा करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 

                         लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती, केसकर वस्ती, रुपनर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागते. तसेच या वर्दळीच्या पुलाचे लोखंडी कठडे ही खराब झाल्याने वाहनचालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे याकडे जलसंपदा विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

                              रामदरा या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना व कोळपे वस्ती, रूपनर वस्ती, केसकर वस्ती या ठिकाणी राहणा-या स्थानिक नागरिकांना लोणी काळभोर गावात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना पुलाचा अंदाज आला आहे. परंतु नवख्या लोकांना पुलाचा अंदाज नसल्याने तसेच पुलाची माहिती नसल्याने मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गावामध्ये येण्यासाठी एकच पूल असल्याने प्रवासास धोका आहे. त्याच पुलावरील उघडे कठडे प्रवाशांना अपघातास निमंत्रण देत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे असून नसल्यासारखेच आहेत. 

                           करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड वर्षांपासून घरात बसून पुरुष, महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर परिसरातील व पुणे शहरातील साधारण एक हजार नागरिक आपली दुचाकी, चारचाकी घेऊन तीर्थक्षेत्र रामदरा येथे सहकुटुंब येतात. त्या बरोबरच तरुण पिढीमध्ये सध्या ट्रेकींगची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील डोंगरावर ट्रेकींगसाठी येणा-या युवकांची संख्याही खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्वां बरोबरच स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागतो.

                             गेल्या एक वर्षापासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावर मालधक्का सुरू झालेला आहे. या मालधक्क्यावरुन सिमेंट, सिमेंट सदृष्य माती आदी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ३० ते ३५ टन माल भरलेल्या ट्रक या पूलावरून जातात. त्यावेळी पूल अक्षरशः हलतो. एखाद्या गाडी सह पूल लवकरच कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

                               तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या रस्त्यावर पुणे कोल्हापूर या लोहमार्गावर पूल बांधावा अशी मागणी ब-याच वर्षांपूर्वी  स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु तत्कालीन प्रशासनाने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग आली. पुण्यातील शिवाजीनगर येथील नाथ हरी पुरंदरे विद्यालयाच्या सहलीची बस व रेल्वे यांचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक, मुले, मुली यांच्या सह ३८ जण मृत्यू मुखी पडले. हि दुर्घटना एवढी भीषण होती कि तत्कालीन रेल्वे मंत्री सी के जाफर शरीफ हे दिल्लीहून घटनास्थळाला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. नंतर लोहमार्गावर तातडीने पूल बांधण्यात आला. अशी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच कालव्यावर नवीन पूल बांधावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हे अपघात स्थळ कालव्या वरील पूलापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.  

 

 अशोक पवार ( आमदार, शिरुर हवेली ) –

 सदरील  ठिकाणचा पूल धोकादायक असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. पुलाचे काम करण्यासाठी पाटबंधारे खात्याला विनंती करण्यात आली असून लवकरच नवीन पूल याठिकाणी बांधण्यात  येईल.

 

पल्लवी जोशी ( शाखा अभियंता, जलसंपदा विभाग ) – या पुलाच्या परिस्थितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच तातडीने काम सुरु करण्यात येणार आहे.   

माधुरी काळभोर ( सरपंच, लोणी काळभोर ग्रामपंचायत ) – कालव्यावरील या पुलाचे काम हे १९६५ साली झाले असून हा पूल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड, खडी व सिमेंट हे निकामी झाले आहे. अवजड वाहने, मोठ्या गाड्या या पुलावरून गेल्यास पूल कंपन होत आहे. त्यामुळे पूल कधीही पडू शकतो यामुळे या पुलावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.