पुणे

कांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

नारायणगाव – कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि निर्यात करात सवलत द्यावी अशी मागणी केली.

गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या आयात – निर्यात धोरणातील धरसोडपणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. कांद्याला चांगला दर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली की निर्यात बंदी आणायची आणि कांदा निर्यात बंदी उठवली की निर्यात करात भरमसाठ वाढ करायची या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ओतूर येथे शेतकऱ्यांचे जन आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर आणि राज्यमंत्री चौधरी यांची भेट घेऊन निर्यात बंदी उठविण्याची तसेच निर्यात करात सवलत देण्याची मागणी केली.

सध्या कांद्याला १४-१५ रुपये किलो दर मिळत आहे. मात्र उत्पादनासाठी १७-१८ रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत कांदा विक्री करावी लागते आहे. त्यामुळे जर निर्यात बंदी उठवली आणि निर्यात कर कमी केले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकेल अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी घेत थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे घातले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी राज्य सरकारने मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमसाठी प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच राज्य सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आपण व आमदार बेनके पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.