पुणे

“हडपसरच्या नागरिकांची समस्या संपणार कधी? सर्वपक्षीय नेत्यांच्या विसंवादामुळे हडपसर बनतेय बकाल”

हडपसर / पुणे (विशेष प्रतिनिधी )
हडपसर मध्ये परतीच्या पावसाने नागरिकांची दैना का उडवली ? नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घरात का शिरले ? उड्डाणपूलाखाली पाणी का साठले ? पथारी वाल्यांचे नुकसान का झाले ? हे व असे अनेक प्रश्न आपल्यावर आपत्ती ओढावल्यावरच पडतात. परंतु हे प्रश्न, समस्या निर्माण होऊ नयेत याकडे मात्र आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो ! पश्चिम पुण्यात विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येतात मात्र पुण्याच्या पूर्व भागातील सर्वपक्षीयांचा विसंवाद हडपसरच्या बकालपनास कारणीभूत ठरत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना पडणाऱ्या या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी सुरुवातीलाच विचार करून कामे केली असती तर बऱ्यापैकी दिलासा जनतेला मिळाला असता !
शेवटी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समितीने याकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून हडपसरच्या नागरिकांना या नैसर्गिक समस्येला तोंड देण्याची वेळ आली असे म्हटलं तर वावगं ठरू नये.
ही त्रेधातिरपीट, दैना का उडाली याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की महंमदवाडी, ससाणे नगर, हडपसर आदी उपनगरातून वाहनारे नाले, ओढे बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या सोईनुसार दाबले, त्याचा आकार भिंत उभारून कमी केला तर काही ठिकाणी त्यावर बांधकामे केलेली आहेत ! तसेच महापालिकेच्या गटार योजनेची पूर्णतः साफसफाई केलेली नसल्याकारणाने सर्व गटाराच्या पाणी रस्त्यावर आणि मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार या मुळे रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.
हडपसरच्या नागरिकांना महापालिकेचे प्रशासक, नगरसेवक, राजकीय व लोकनेते, स्वयंमघोषित पुढारी, नेहमी शांत, संयमी म्हणून गृहीत धरतात व आपापल्या परीने आपल्या लोकांची कामे करतात असे परिसरातील नागरिक बोलतात. आपण लोकनेते आहोत व आपल्या नागरिकांना भविष्यात समस्या येणार नाहीत यासाठी स्वतः हून काही तरी आपण पक्षीय मतभेद बाजूला सारून कामे करायला हवी असे वाटत नाही असे बहुतांश लोकनेत्यांना वाटत नाही असे खेदाने म्हणावे लागते.
परिसरातील लोकनेत्यानी अभ्यास करून भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांचा विचार केला तर आज उद्भवलेली परिस्थिती व नागरिकांना होणारा त्रास नक्कीच कमी करता आला असता असे वाटते. कोण्या एका राजकीय पक्षाला किंवा लोकनेत्यांना बोलण्याचा उद्देश नक्कीच नाही, परंतु सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या समस्या येणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्यायला हवी ! नुसते मोठमोठे बॅनर्स लावून किंवा वाढदिवस साजरे करून लोकनेता किंवा सामाजिक कार्यकर्ते आपण होऊ शकत नाहीत हे ध्यानात घ्यायला हवे. समाजात उद्भवणाऱ्या समस्या सोडवल्या, चांगल्या योजनांचा पाठपुरावा करून परिसरात आणल्यास नागरिक स्वतः त्यांना नेता म्हणून समजतात हे विसरून चालणार नाही !

सुधीर मेथेकर,
हडपसर
लेखक पूर्वी दैनिक लोकसत्ता मध्ये विविध विषयांवर लिखाण करत होते.