दिल्ली

देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील वातावरण बिघडतंय –  खासदार डॉ. कोल्हे यांनी दाखवला सरकारला आरसा

पुणे – देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील माहौल बदलतो आहे. जी-२० चे अध्यक्षपद भूषवताना आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगाला देतो आहोत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच देशातील जनतेला सांगतोय की, हा देश तुमचा नाही, इथल्या पाण्यावर तुमचा हक्क नाही. देशातील वातावरण बिघडतंय कारण हिंदू – मुस्लिमांच्या बरोबरीने दलित-सवर्णातील दरी वाढताना दिसते आहे अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला आरसा दाखवला. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते.

कुणी सवर्णांचे पाणी प्यायला म्हणून मारहाण होते तर, कुणी मिशी वाढवली म्हणून वा लग्नासाठी जाणारा एखादा तरुण घोडीवर बसला म्हणून मारहाण होते. अशा परिस्थितीत आपण कोणत्या विकासाच्या दिशेने जाता आहात असा सवाल करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी अलिकडच्या काळात घडलेल्या दुर्दैवी घटनांचा दाखला दिला. धर्माचा अभिमान असणं संयुक्तिक आहे, पण या अभिमानाचं रुपांतर धार्मिक उन्मादात होतं तेव्हा अमृतकाळात जे हलाहल निर्माण होईल त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याचे परिणाम कोण भोगणार? असा थेट सवाल केला.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरूर या राष्ट्रीय महामार्गांची ३० हजार कोटींची कामे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. त्याचबरोबर गेली २५ वर्ष जनतेने पाहिलेले स्वप्न पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी देऊन पूर्ण केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले.

आपल्या भाषणाच्या पूर्वार्धात राष्ट्रपतींच्या भाषणातील गरीबांना घरे देण्याच्या वक्तव्याचा धागा पकडून खासदार डॉ. कोल्हे यांनी सरकारच्या धोरणातील विरोधाभासावर बोट ठेवले. एकीकडे आपण गरीबांना घरे देण्याच्या गोष्टी करतो तर दुसऱ्या बाजूला शिरूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड व भोसरी येथील रेडझोन हद्द २००० यार्ड घोषित करुन ५ लाख कुटुंबांची घरे अनधिकृत ठरवत त्यांच्यावर टांगती तलवार ठेवतो. रेडझोन हद्दीबाबतच्या कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवताना ब्रिटीशांच्या १९०३ च्या कायद्यानुसार काही ठिकाणी २००० यार्ड तर स्वतंत्र भारताने २००५ मध्ये केलेल्या तरतुदीनुसार २७० ते ५०० मीटर रेडझोन हद्द करतो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत काळात ब्रिटिश कायद्याचा त्याग करून पिंपरी, चिंचवडसह देशातील अन्य ठिकाणची रेडझोनची मर्यादा ५०० मीटर करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

अभिभाषणावर बोलण्यासाठी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवीत खासदार डॉ. कोल्हे यांनी ब्रिटीश काळातील भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर आजतागायत कायमस्वरूपी भगवा ध्वज लागलेला नाही याकडे सरकारचे लक्ष वेधून ‘जे केंद्र सरकार ३७० कलम हटवू शकते, ते सरकार भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमध्ये सुधारणा करून शिवनेरीवर भगवा ध्वज लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करु शकत नाही? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘धोरण लकव्या’चा अनुभव आपण घेत असल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी मी गेल्या ३-४ वर्षांपासून करतो आहे. एकीकडे आपण गायीला माता संबोधून तिची पूजा करतो, मात्र गोवंश वृद्धिसाठी अत्यावश्यक असलेला बैलाचा वाघ, सिंह, अस्वल आणि माकडांचा समावेश असलेल्या संरक्षित सूचीत करतो, या विरोधाभासाकडे लक्ष वेधताना जलिकटू, रेकला, बैलगाडा शर्यत यांच्यावरील बंदीसाठी सातत्याने न्यायालयात जाण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा वास सरकारला येत कसा नाही असे सांगून गोवंश मांसाच्या निर्यातीत दहाव्या स्थानी असलेला भारत गेल्या काही काळात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे याकडे लक्ष वेधले.

आदिवासी जनतेच्या उपजिवीकेच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या बाळ हिरड्याला बाजाराशी लिंक करावं या मागणी बरोबरच हिरड्या वर प्रक्रिया उद्योग व्हावा अशी मागणी केली. त्याचबरोबर जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

महाराष्ट्रात विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने रात्री शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर रोज बिबट्यांचे हल्ले होत आहेत. दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बिबट्यांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी धोरण तयार करावे अशी मागणही केली.

नामोल्लेख न करता थेट पंतप्रधान मोदी यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदीजी सर्वात प्रभावशाली नेते आहेत हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. पण त्याचबरोबर प्रभावशाली व्यक्तीचे नुकसान त्यांचे अनुयायी करतात हा इतिहास आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अंधभक्त आणि प्रश्न विचारण्यापेक्षा तळवे चाटणाऱ्या मिडियाच्या काही व्यक्तींपासून सावध राहण्यातच देशहित असल्याचे बजावले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबरोबरच देशातील बिघडणारे वातावरण, धोरणातील व कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत अस्खलित हिंदीत केलेल्या प्रभावी भाषणा आज डॉ. कोल्हे यांनी पुन्हा सभागृह गाजवले.