पुणे

हडपसरमध्ये खंडणीखोर टोळीवर मोठी कारवाई! रिजवान उर्फ टिपू पठाण टोळीवर तिसऱ्यांदा MCOCA

पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई म्हणजे काळेपडळ पोलिसांची मोठी आणि धडाकेबाज कामगिरी मानली जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या प्रकरणात गुन्हा क्रमांक ७६/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
आरोपी रिजवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या सात साथीदारांनी सय्यदनगर, हडपसर येथील ख्वॉजा मंजिलमधील ऑफिसमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला बोलावले.
त्यानंतर त्या व्यावसायिकाला धमकावून सांगण्यात आले की, जर हॉटेल चालू ठेवायचे असेल तर त्यांच्या भागीदारीतील मटन दुकानातूनच मटन खरेदी करावे लागेल.
इतकंच नाही…त्याचबरोबर दरमहा पाच हजार रुपये खंडणी देण्याची मागणी देखील करण्यात आली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलीस तपासात उघड झाले की,ही टोळी अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करून व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत होती.

टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू पठाण याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणूनच या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी फैजान उर्फ पच्चीस रमजान उर्फ कादर शेख सय्यदनगर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे काळेपडळ पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करून सापळा रचत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
या आरोपीला १३ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे व काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तसेच पोलीस कर्मचारी राजेंद्र वाघमारे, दादासो नाळे, राजकुमार काळभोर, लाहिगुडे, परशुराम पिसे, अमोल फडतरे, सय्यद, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, काळे, पंघरकर, तांबोळी, शिंदे, बेडीस्कर, जगदाळे व परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
पुण्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.