“मम्मी, मला शोधू नका…” चिठ्ठी लिहून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता!
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “मम्मी, मला शोधू नका… मी मोठा होऊन दाखवीन,” अशी चिठ्ठी लिहून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील आर्यन निलेश गवारे हा १६ वर्षे ८ महिन्यांचा विद्यार्थी सोमवारी सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला. मात्र तो कॉलेजलाच पोहोचला नसल्याचे समोर आले.
सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्याची दुचाकी नातेवाईकांच्या घराजवळ सापडली. गाडीच्या डिक्कीत मिळालेल्या वहीत, “मम्मी, मी तुला एक दिवस लय मोठा होऊन दाखवीन… आता माझे नशीब मीच लिहिणार… मला शोधू नका प्लीज,” अशी चिठ्ठी आढळली.
तपासात आर्यन आणि त्याचा मित्र मुंबईला जाऊन काहीतरी मोठं करण्याची चर्चा करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलाचा शोध सुरू आहे. या वर्णनाचा मुलगा कुठे आढळल्यास तात्काळ उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





