कराडमध्ये मोठी चोरी! स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडली; 300 मोबाईल आणि तब्बल 60 लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याची प्राथमिक माहिती.

Rokhthok Maharashtra 4 0

कराड शहरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोहीते हॉस्पिटलजवळील एसएस मोबाईल शॉपीला चोरट्यांनी लक्ष्य करत धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्विफ्ट कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. तब्बल 300 मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा असून, त्यांची किंमत सुमारे 60 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चोरट्यांनी दुकानात प्रवेश कसा केला? चोरीनंतर ते कोणत्या दिशेने पसार झाले? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, चोरीला गेलेल्या मोबाईलची नेमकी संख्या आणि एकूण किंमत पंचनामा व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, कराडच्या गजबजलेल्या परिसरात झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.