साताऱ्यातील १० महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकल्या; शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याचाही समावेश, हॉटेलमधून काय माहिती दिली?

Rokhthok Maharashtra 4 0

 

महाबळेश्वरमधील दहा महिला पर्यटक महापुरामुळे नेपाळमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आणि शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि त्यांच्या मैत्रिणींचा समावेश आहे. SIT Tours And Travels कंपनीसोबत त्या नेपाळला पर्यटनासाठी गेल्या आहेत. प्रलयाच्या ठिकाणापासून 350 किलोमीटर दूर असलेल्या पोखरा शहरातील हॉटेलमध्ये आम्ही सुरक्षित असून कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मेघा चोरगे यांनी ‘मटा ऑनलाइन’ला दिली.

महाबळेश्वरमधील मेघा चोरगे आणि त्यांच्या मैत्रिणी, अशा दहा जणींचा ग्रुप ट्रॅव्हल्स कंपनी सोबत नेपाळ पर्यटनासाठी गेला आहे. जलप्रलयामुळे नेपाळमध्ये प्रचंड हाहाकार माजला असून महापुरामुळे सर्व पर्यटन ठप्प झाले आहे. धडकी भरवणाऱ्या प्रलयामुळे महाबळेश्वरमधील महिला पर्यटक भीतीच्या छायेत आहेत. सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा दिलासा जिल्हा प्रशासनाने त्यांना दिला आहे.

पर्यटनासाठी गेलेल्या मेघा चोरगे या शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आहेत. मी व माझ्या नऊ मैत्रिणी, अशा आम्ही दहा जणी SIT tours and travels कंपनीसोबत नेपाळमध्ये आलो आहोत आणि आम्ही सध्या पोखरा या शहरामध्ये सुरक्षित आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या सोबतच्या काही महिलांना असुरक्षित वाटत असल्याने त्या घाबरल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील काळजीत आहेत.

नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नेपाळमधील पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची माहिती संकलित केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही. त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील (नियंत्रण कक्ष) 02162-232349, 02162-232175, 9657521122 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.