माझ्यावर पाळत ठेवून माझा पाठलाग केला जात आहे-सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात आरोप

Rokhthok Maharashtra 5 0

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीच्या फौजदारी खटल्यात आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली. राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून सुरू असलेल्या उलट तपासादरम्यान खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले जात असल्याने आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची व पाठलाग होत असल्याची भावना निर्माण झाली आहे, असा आरोप तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी त्यांचे वकील अ‍ॅड संग्राम कोल्हटकर यांच्या माध्यमातून न्यायालयात दाखल केलेल्या अर्जातून केला आहे.
पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सात्यकी सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू आहेत.
सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात, उलट तपासादरम्यान राहुल गांधीं यांचे वकील ॲड पवार यांच्याकडून आपण कुठे जातो, कोणत्या संघटनांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो आणि कोणत्या उपक्रमांमध्ये सहभागी होतो, यासारख्या खासगी बाबींवर प्रश्न विचारले जात असल्याची हरकत नोंदवली आहे. या प्रश्नांमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, आपल्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावाही त्यांनी अर्जात केला आहे.
उलटतपास सुरू होऊन जवळपास दहा महिने झाले असूनही तो पूर्ण झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
आजच्या उलटतपासात महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वी काही व्यक्तींना या घटनेची माहिती होती का, तसेच गांधीहत्येतील आरोपींनी कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर पुण्यातील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळकांचे नातू जी. व्ही. केतकर होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधी यांची हत्या होणार असल्याची माहिती सहा महिने आधीपासून असल्याचे सांगितल्याचा संदर्भ उलट तपासादरम्यान उपस्थित करण्यात आला.
या भाषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कपूर आयोगाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. कपूर आयोगाची स्थापना झाली होती, हे सात्यकी सावरकर यांनी मान्य केले; मात्र आयोगाच्या स्थापनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि कारणांबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वी पंधरा दिवस आधीच आजी सिंधू गोडसे यांना या घटनेची माहिती होती, या संदर्भातील प्रश्नही उलटतपासात उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आज उलट तपासात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जीवनलाल कपूर या आयोगाचा निष्कर्ष व अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे आजचा उलटतपास तहकूब करण्यात आला. या प्रकरणातील पुढील उलटतपास २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी जाधव आणि ॲड. सुयोग गायकवाड हे त्यांना सहकार्य करीत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.