पुणे

कर्करोगाशी झुंज अपयशी – भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. मुक्ता टिळक गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या सकाळी ९ ते ११ या वेळेत केसरीवाडा येथील राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशामभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापालिकेच्या इतिहासात भाजपाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला होता. अडीच वर्षे त्या महापौर होत्या. नगरसेवक असतानाच त्यांनी २०१९ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या.

कर्करोगाने ग्रस्त असूनही पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मुंबईत

मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास नगरसेविका म्हणून सुरू झाला होता. त्या चारवेळा नगरसेविका होत्या. भाजपातही त्यांनी विविध पदे भूषविली. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोग या असाध्य आजाराने ग्रस्त होत्या. दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत रुग्णवाहिकेतून मुंबईत जाऊन मदत केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते.