पुणे

फिरकीचा तांब्या….एक दुर्मिळ आठवण….

हल्ली प्रवासाला निघाल्यावर घरातील वडीलधारी मंडळी आवर्जून विचारतात की, अरे पिण्याच्या पाण्यासाठी जार,भांड वगैरे घेतले का ? त्यावेळी आपल हमखास उत्तर असते ते घेतो पाण्याची बाटली ! कारण हाताला ओझं नको असते ना ! अन् तस पिण्याच्या पाण्यासाठीचे भांड बाळगायला लाजही वाटते यामुळे आजकालच्या आधुनिक काळात पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी झाली आहे ती प्लास्टिकच्या बाटल्या मधुन ! किती किती सोयी झाल्या आहेत नाही का ? प्रेमाने दिलेली शिदोरी सांभाळायची न झंझट न पिण्याच्या पाण्यासाठी जार सांभाळायची झंझट ! कारण एक-एक, दोन-दोन फर्लांगावर हॉटेल, ढाबे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मिळताहेत. मग काय चिंता मिटलीचना ! नको ते सांभाळायला पिण्याच्या पाण्याचे जार ना शिदोरी. मस्त एन्जॉय करायचा प्रवासात, कारण आता आपल्याकडे बखळ पैसे आहेत ना !

 

हे सर्व असलेतरी मागें वळून पाहिलं तर सर्कंन इतिहास समोर येतोच. आपण ज्यावेळी प्रवासाला निघत त्यावेळी आवर्जून सोबत असायची ती शिदोरी अन् फिरकीचा तांब्या ! ज्यात घरातील पाणी भरून घेतलेलं असायचं. जरी या तांब्यातील पाणी संपल तरी प्रवासात कुठेना कुठे शेत, विहीर हमखास असायची, तेथे थांबून सोबत असलेली शिदोरी सोडायची आणि शेतातील झाडाखाली मस्त जेवण करायचे, मोटेतून पाटात खळखळ वाहणारे स्वच्छ, थंडगार ओंजळभर पाणी प्यायचे आणि नंतर तांब्यात भरून घ्यायचे ते पुढील प्रवासासाठी. किती छान वाटायचं बरं का.

 

आता रस्त्याच्या दुतर्फा फारशी झाडही दिसत नाही आणि मोट तर नाहीच नाही. आता चालक गाडी थांबवेल तिथे थांबायचं आणि जे असेल ते खणखणीत पैसे मोजून खायचे ! पंधरा-वीस रुपये मोजून पिण्याच्या पाण्याची (मिनरल वॉटर) फक्त एक लिटरची बाटली घ्यायची. पाणी पिऊन झाले की ती प्लास्टिक बाटली रस्त्यावर भिरकावून द्यायची ! सांभाळाची येथे झंझटच नाही हो ! प्लास्टिक बाटल्यांचा खच रस्त्यावर पहायला मिळतो, यामुळे गाड्यांचे अपघात होतात, प्रदूषणात वाढ होते. परंतु मला काय त्याचे ! मला काही सांभाळावे लागत नाही ना ! मग त्याची चिंता मी कशासाठी करावी ही मानसिकता तयार झाली आहे !!

 

पुणे येथे काय उणे म्हणतात ना ! ते खरंच आहे बरं का, प्रदूषण कमी करण्यासाठी व अपघात होऊ नयेत म्हणून चक्क रस्त्यावरीर प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यासाठी स्पर्धाच आयोजित केली होती म्हणे ! अन् सुजाण नागरिकांनी प्रतिसाद सुध्दा उत्तम दिला असे कळते. या संकलित बाटल्याचा वापर रस्ता तयार करण्यासाठी व “टि”शर्ट बनविण्यासाठी करत असल्याचे समजले. असो.

एका फिरकीच्या तांब्याने फिरवलं मात्र भरपूर. यामुळे फिरकीचा तांब्या मनातून काही जात नाही. तुमच्या कडे असेल तर स्वच्छ धूवून शोकेस मध्ये नक्की ठेवा, एक पूर्वजांची आठवण म्हणून !!

सुधीर मेथेकर,
हडपसर, पुणे