पुणे

“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती !” – महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तानाट्य”

दिनांक 2 तारखेला राजकीय भूकंप झाला आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सायंकाळी लगेच सोशल मीडियावर विविध राजकीय वैचारिक(!) मेसेजेस फिरू लागले आहेत. त्यातील एक मेसेज फार बोलका आहे तो –

शिवसेना + BJP बघून झाले….,

एनसीपी + काँग्रेस बघून झाले….,

BJP + एनसीपी  बघून झाले..,

शिवसेना + एनसीपी + काँग्रेस बघून झाले..,शिवसेना without ठाकरे + BJP पण बघून झाले..,आता फक्त BJP + काँग्रेस

*बघितले की आम्ही मतदार चारधाम यात्रा करायला मोकळे…..*

 

थोडक्यात सत्ता संघर्षात कसं राजकारण होतंय ते आता सर्वसामान्य जनतेला कळायला लागले आहे. या अडीच-तीन वर्षात तर शाब्दिक चिखलफेकीने अतिशय खालची पातळी गाठलेली आपण टिव्हीच्या माध्यमातून पहात आलो आहोत. आता याचा जनतेला वीट आला असताना हा अजून एक धक्का दिला आहे. मी आजपर्यंत जसं राजकीय घडामोडी पहात आलो त्याचा विचार करता पूर्वी (साधारण 1980 पर्यंतचे) राजकीय कुरघोडी करताना कुठल्याही राजकीय नेत्यांनी टिका करताना वैचारिक पातळी सोडलेली ऐकवत नाही ! असो ते सोडून दिले तरी सुशिक्षित राजकीय नेते मंडळी असे बेताल वक्तव्य करताना पाहून मन विद्यग्न होते ! अशा नेत्यांना परमेश्वर सुबुद्धी देवो.

 

नुकताच राजकीय भूकंप झाला आहे आपण पहात आहोत. यासंदर्भात असंच एका ठिकाणी उभा होतो, बरीचशी तरुण मंडळी या राजकीय घडामोडींवर चर्चा करीत असताना त्यातील एकाने प्रश्न केला, अरे आता आपण कोणाच्या मागें उभे रहायचे रे !पुर्वी अखंड राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता, तेथे फुट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली यानंतर शिवसेनेत फुट पडून तेथे दोन गट झाले त्यातील उध्दव ठाकरे यांचा एक गट आणि दुसरा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाली ! 

 

आता आपण काय करायचं? त्यात दुसरा एकजण म्हणाले, आरे आपण उगाच डोक्याला ताप करून घेत आहोत ! कारण हे राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी काहीही करतात. ते असं करताना आपल्याला कधी विश्वासात घेतात कारे भाऊ ! आपण उगाच आपलं कामधंदा सोडून यांच्या मागें पळतो. त्यांच्यासाठी वेळप्रसंगी आपापसात लढतो, हाणामाऱ्या करतो, काही वेळा पोलीसांच्या लाठ्या सुध्दा खातो,  याचा आपल्याला काय फायदा ? आपण जरूर याचा विचार करायला हवा नाही का ? यावर काही मित्रांनी दुजोरा दिला व म्हणाले खरंच आपण शहाण व्हायला हवे !

 

हे ऐकल्यावर मला मध्यंतरी आलेला “झेंडा”  सिनेमा आठवला, त्यातील एक गीत फार प्रसिद्ध झाले होते, “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती !”  राजकारणावर वास्तव चित्र या चित्रपटात मांडले होते. खरंच आजच्या राजकीय भुकंपाकडे पाहिलं नंतर असं वाटतंय की तरुण वर्गाने कुणाच्या मागें जावे ? कारण नेतेमंडळी त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारण करतात. अन् यामुळे कार्यकर्त्यांना मात्र निराधार झालो असं वाटतं ! राजकारणात काहीही घडू शकते एवढे मात्र खरं. असो बघुया पुढे काय काय घडते ते.

 

सुधीर उध्दवराव मेथेकर,

हडपसर