पुणे

“वाहने फोडणाऱ्या सूरज पंडित टोळीवर मकोकांतर्गत कारवाई, हडपसर पोलिसांचा भाईगिरी करणाऱ्या गुंडांना दणका…

हडपसर, दि. 18 ः आमचा नाद कोणी करायचा नाही, आम्ही भाई लोक आहोत, असा आरडाओरडा करीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीप्रमुख सूरज रमेश पंडितसह त्याच्या 10 साथीदारांवर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली. हडपसर, सुरक्षानगर रस्ता येथील गोसावीवस्तीमध्ये 25 ऑक्टोबर रोजी आरोपींनी 30 हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम चोरून नेत लोखंडी हत्यार हवेत भिरकावून दहशत पसरविली.

टोळीप्रमुख सूरज रमेश पंडित (वय 29, रा. नीलेश क्लासिक सोसायटी, हांडेवाडी रोड, पुणे, यश प्रदीप जावळे (वय 23, रा. श्रीराम चौक, सातवनगर रोड, हडपसर), युवराज प्रकाश बढे (वय 23, रा. साई कॉलनी, वाडकरमळा, महंमदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, अक्षय राऊत (रा. सय्यदनगर, मंहमदवाडी रोड, पुणे), समीर बागवान (रा. वाडकर मळा, महंमदवाडी), शिवा कानगुले (रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड) आणि 4-5 अनोळखी फरार आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, टोळीप्रमुख सूरज पंडित याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून, हडपसर, काळेपडळ, गोसावीवस्ती, हांडेवाडी रोड परिसरात वर्चस्व वाढविण्यासाठी संघटित गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्याराच्या धाकाने खंडणी स्वरूपात पैसे उकळतात, छोटे व्यावसायिक, दुकानदार, पथारीवाल्यांकडून दमदाटी करीत हप्ता घेतात. टोळीच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक भयभीत झाला असून, त्याच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यास धजावत नाही. आरोपीवर शहर-ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दहशत पसरविणे, जीवे मारणे, जबर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षिका सारिका जगताप, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, हनुमंत झगडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.