नवी दिल्ली :
भारत-पाकिस्तान युद्धाचे सावटाखाली असलेली आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेवरच होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही माहिती देताना सर्व अटकळींना विराम दिला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ मार्चनंतर कधीही होण्याची शक्यता आहे .
पुलवामाच्या घटनेनंतर भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव शिगेला पोहोचल्यामुळे लोकसभा निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण सुनील अरोरा यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक ठरल्यानुसारच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ ते १० मार्च यादरम्यान कधीही होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण सूत्रांच्या मते ८ मार्चला घोषणा होण्याची जास्त शक्यता आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व एक लाख ६३ हजार ३३१ मतदानकेंद्रांवर व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआशी लढण्यासाठी सज्ज झालेल्या २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएम मतमोजणीसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारे निवडणूक आयोगाला लेखी निवेदन दिले आहे. पण निवडणूक आयोगाने आतापर्यंत या मागणीवर कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
मात्र, अरोरा यांनी ईव्हीएमवर भाष्य केले. निकाल अनुकूल लागले तर ईव्हीएम ठीक आहे आणि विरोधात गेले तर ईव्हीएम खराब, अशी प्रतिक्रिया उमटते. आम्ही कळत नकळत संपूर्ण देशात ईव्हीएमला फुटबॉल बनवले आहे, असे मत अरोरा यांनी यावेळी व्यक्त केले.
