गुडीपाडवा मराठी माणसाच्या मनातील मोठा सण. याची सर्व मंडळी आतुरतेने वाट पहात असतात तो चैत्र शुद्ध १, रविवार ३० मार्चला २०२४ म्हणजे आज आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण घराघरांवर गुढी उभारुन आनंदाने, उत्साहाने साजरी करतो. यालाच आपण गुढीपाडव्याचा सण म्हणतो हे सर्वांना माहीत आहे. मराठी वर्ष श्री शालिवाहन शके १९४७. शालिवाहन शकाच्या तारखेत ७८ मिळवले की आपले इसविसन मिळते जसे :
शके १९४७+७८=इसवी सन २०२५.
चैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो म्हणजे आपल्या मराठी महिन्याची, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. निमित्ताने सर्व बंधू/भगिनींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे.
पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो.
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी.
नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात तसेच प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गुळ हे कडुनिंबाच्या पानांबरोबर/फुलांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं.
पंचाग कर्त्याच्या माहिती नुसार सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीत असताना चैत्र महिना सुरू होतो, आणि तो सूर्याच्या मेष राशीच्या प्रवेशानंतर काही दिवसांनी संपतो.
चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते असे मानले जात असलेतरी ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत.
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रारंभ, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन, चैत्र गौर तृतीया, मुस्लिम समाजातील रमझान मास, या नंतर येते ती हिंदू धर्मातील श्रध्दास्थान असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध ९ – अर्थात रामनवमी, जागतिक आरोग्य दिन (०७ एप्रिल), चैत्र शुध्द १३ ला(१० एप्रिल ) अहिंसा परमोधर्माचे आद्य प्रवर्तक महावीर जयंती, यानंतर चैत्र पौर्णिमेला येते रामभक्त हनुमान जयंती(१२ एप्रिल ) व महात्मा फुले जयंती(११ एप्रिल) त्या पाठोपाठ येतो तो ख्रिश्चन समाजाचा गुड फ्रायडे (१८ एप्रिल) आणि आपल्या आरोग्याशी निगडित सतर्क रहाण्यासाठीची जनजागृती करण्यासाठीचा जागतिक आरोग्य दिन.
अशा विविध सणवारांनी नटलेला हा चैत्र महिना आहे.
सूर्य संवेदना पुष्पे:,दीप्ति कारुण्यगंधने।
लब्ध्वा शुभम् नववर्षेअस्मिन् कुर्यात्सर्वस्य मंगलम् ॥
सुधीर मेथेकर,
पुणे