पुणे

“हडपसरच्या नागरिकांचा अंत पाहू नका, वाहतूककोंडी सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरणार – युवक काँग्रेसचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मतदारसंख्येचा हडपसर विधानसभा मतदारसंघ, जिथे सहा लाखांहून अधिक मतदार राहतात, तिथे वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. चुकीच्या नियोजनाचे उड्डाणपूल, अरुंद रस्ते, पथारी अतिक्रमण, अपुरे वाहनतळ, कमी वाहतूक पोलीस आणि कमकुवत पर्यायी मार्ग यामुळे हडपसरकरांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी हडपसर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मतीन शेख यांनी राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. या मागणीस इम्रान शेख, पुणे शहर जिल्हा काँग्रेस संघटक यांनी जोरदार पाठिंबा दर्शवला असून त्यांनी या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

इम्रान शेख यांचा ठाम पवित्रा:
“हडपसर परिसरात केवळ वाहतूक व्यवस्थाच नव्हे तर नागरिकांचा दैनंदिन जीवन प्रवाहच अडथळ्यांत सापडला आहे. परीक्षा केंद्र, हॉस्पिटल, शाळा आणि औद्योगिक वसाहती यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. युवक काँग्रेसच्या मागण्या ही केवळ राजकीय भूमिका नसून, जनतेच्या वेदनांचा आवाज आहे,” असे स्पष्ट मत इम्रान शेख, पुणे शहर जिल्हा काँग्रेस संघटक यांनी मांडले.

वाहनतळांच्या अभावामुळे रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. पथारी अतिक्रमण, अपुरे वाहतूक पोलीस आणि पर्यायी मार्गांचा अभाव यामुळे रोजचीच कोंडी निर्माण होते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम उड्डाणपूल परिसर, तसेच रामटेकडी परीक्षाकेंद्र याठिकाणी विशेषतः गर्दी आणि खोळंबा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. परीक्षांच्या दिवशी तर विद्यार्थी, पालक आणि स्थानिक यांच्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच कोलमडते.

राज्य मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत सहा पदरी रस्ता प्रकल्पाला मंजुरी दिली असली, तरी अंतर्गत रस्ते, अतिक्रमण आणि वाहनतळ यांसारख्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी एकमुखी मागणी युवक काँग्रेस आणि इम्रान शेख यांनी केली आहे.

आमची मागणी:
– पथारी अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम
– पादचारी मार्ग मोकळे करणे
– सार्वजनिक वाहनतळांची निर्मिती
– वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे
– पर्यायी मार्गांचे सक्षमीकरण
– परीक्षाकेंद्र परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था

– मतीन शेख, अध्यक्ष, हडपसर विधानसभा युवक काँग्रेस

“हडपसरच्या जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे. प्रशासनाने आता झोपेतून जागे होऊन जनतेच्या जिवाशी खेळ थांबवावा. हडपसरसाठी आम्ही रस्त्यावरही उतरण्याची तयारी ठेवतो,” असा इशारा त्यांनी दिला.