पुणे

जुन्नर तालुक्यातील खोडद येथे मधमाश्यांच्या हल्ल्याची गंभीर दखल; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जिल्हा प्रशासनाला तत्काळ उपाययोजनांचे निर्देश पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती आणि माहिती फलक लावा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : जुन्नर तालुक्यातील खोडद गावाजवळील वडाच्या झाडा जवळ मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि उपवनसंरक्षक, पुणे यांना तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जिल्ह्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती. मात्र, अद्याप या दिशेने पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हाधिकारी पुणे यांनी तत्काळ सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून मधमाश्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण होईल अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात.

या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी असेही सुचवले आहे की, जिल्हाधिकारी यांनी संभाव्य धोकादायक ठिकाणे निश्चित करून तेथील नागरिक आणि पर्यटकांना मधमाश्यांपासून संरक्षण कसे करावे याची माहिती द्यावी. यासाठी माहिती फलक, पत्रके आणि इतर माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यात यावी. याचबरोबर पुरातत्व विभागाने त्यांच्या अधिपत्यातील ऐतिहासिक स्थळांवर मधमाश्यांपासून बचावासाठी विशेष उपाययोजना आखाव्यात. उपवनसंरक्षकांनी तज्ज्ञांच्या मदतीने मधमाश्यांचे स्थलांतर किंवा नियंत्रित व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

“लोकांचे प्राण, सुरक्षितता, पर्यावरणाचे रक्षण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने आणि समन्वितपणे कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक पावले उचलून केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांच्या कार्यालयास कळवावी, असे निर्देशही दिले आहेत.